महाराष्ट्र

शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे सह १३ आमदार नॉटरिचेबल

न्यूज महाराष्ट्र 24 प्रतिनिधी मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत भाजपने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची मते फोडत पाचवी जागा निवडून आणली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांपैकी जवळपास २० मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरलेली असतानाच शिवसेनेचे १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. नॉट रिचेबल असलेले सर्व आमदार हे शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असल्याचं सांगण्यात येत आहे.एकनाथ शिंदे हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. शिवसेनेकडून वारंवार ही चर्चा फेटाळून लावण्यात येत असतानाच आता मात्र मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर काल संध्याकाळपासून शिवसेनेचे १३ आमदार कोणाच्याही संपर्कात नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची अनुपस्थिती हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. दुपारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार का? रात्री झालेल्या बैठकीनंतर आज दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा शिवसेनेकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येत आहे. मात्र हे सर्व आमदार दुपारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.नेमकी किती मते फुटली?विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडे स्वत:ची १०६ मते होती. तसंच इतर अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते मिळून भाजपचं संख्याबळ ११३ पर्यंत जात होतं. मात्र काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल १३४ मते मिळाली आहेत. त्यामुळे आघाडीची जवळपास २० ते २१ मते भाजपने खेचल्याचं दिसून आले. भाजपने राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी १० जास्त मतं फोडून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ हा जादुई आकडा आहे. या आकड्यापासून भाजप आता केवळ ११ मतांनी दूर आहे. त्यामुळे ही बाब सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!