विशेष

अवघे, दोन वर्ष १० महिन्याच्या केशवीने भीमाशंकर गड अकरा तासात केला सर

ज्ञानेश्वर रामोशी

बोईसर : महाराष्ट्रातील भीमाशंकर गडाचे नाव घेता भल्या भल्या ट्रेकर्सना घाम फुटतो. परंतु डहाणूतील वडकुन येथल्या केशवी राम माच्छी या दोन वर्षे दहा महिन्याच्या चिमुकलीने केवळ अकरा तासात सतरा कि.मी. गडाची चढाई पूर्ण केली. डहाणूतील गडप्रेमी ट्रेकर्स ग्रुपने 31 जुलै रोजी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाच्या गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले होते. याकरिता ३० जुलै च्या रात्री दहाच्या सुमारास खाजगी वाहनाने प्रवास सुरू केला. या ग्रुप सोबत वडकुन खेतीपाडा येथील आनंद माच्छी, पत्नी व बहीण, हे निघाले. मात्र आपण सोबत येणार, असा हट्ट केशवीने धरला. केशवी काही ऐकाना म्हणून तिलाही सोबत घेतले. तिच्या एवढ्या लहान वयाचा विचार करता ती भीमाशंकर गडाची चढाई करेल का? असा प्रश्न गडप्रेमी ग्रुप व तिच्या कुटुंबियांच्या मनात पडला. तिच्या चढाई बाबत सर्वांना शंका होती. सकाळी साडे दहाच्या वाजता केशवीने खांडस गावातून भीमाशंकरच्या चढाईला सुरुवात केली. गड प्रेमी ट्रेकर्स ग्रुप सोबत केशवीही चालत निघाली. या गडावर चढाईसाठी पायऱ्या नसल्याने काका, काकू चा तर कधी आत्या व बहिणीचा हात धरून ती चालू लागली. या प्रवासात केशवीला तिच्या कुटुंबीयांनी तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. भीमाशंकर गडावरील, हिरवी झाडे, छोटे धबधबे, पक्षी, माकड, शेकरू, गाई ढोरे, पाहून जणू भुरळ पडल्याप्रमाणे ती शिखराकडे मार्गक्रमन करत होती. श्रावणमास सुरू असल्याने भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भक्तांची खूपच गर्दी होती. छोट्या केशवीचे धाडस व उत्साह पाहून त्यांच्याकडून कौतुक सुरू होते. त्यामुळे तिचा उत्साह वाढल्याने कोणतीही कुरबुर अथवा मदत न घेता गणेश घाटाच्या मार्गाने बारा वाजल्याच्या सुमारास केशवीने ८.७० कि.मी चढाई पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा दीड वाजता परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतरही ती स्वतः हून पुढे आली तिचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. गडाचा पायथा गाठताना ती थकली, मात्र गडप्रेमी ग्रुपने तिला प्रोत्साहित केल्याने साडेसहाच्या सुमारास तिने एकटीने यशस्वीरीत्या भीमाशंकर गडाचे ट्रेकिंग पूर्ण केले. केशवीला गडावर चढाई करण्यासाठी सहा तास तर परत येण्यासाठी ५ तास तीस मिनिटे लागली. तब्बल १७ कि.मी. चा ट्रेक पूर्ण करण्यासाठी केशवीला अकरा तास तीस मिनिटांचा कालावधी लागला. या ट्रेक स्पर्धेत ६२ स्पर्धकांनी भाग घेतला होता. केशवी राम मच्छी ही सर्वात लहान वयाची स्पर्धक होती. तिचे अवघे वय दोन वर्षे दहा महिन्याचे आहे. तीन वर्षे सुद्धा पूर्ण झालेली नाहीत. एवढ्या लहान वयात तिने भीमाशंकर गडाची चढाई कुणाच्या मदतीविना पूर्ण केली. तिचीही पहिली ट्रेक होती. केशवीला ट्रेकचे धडे तिचे चुलते आनंद माच्छी यांच्याकडून मिळाले. केशवीच्या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. कोणतेही प्रशिक्षण, सराव, इत्यादीचा अभाव असताना तिने काका सोबत ट्रेकिंगला जाण्याच्या जिद्दीपोटी भीमाशंकर गडाची यशस्वीरित्या चढाई केली.या ट्रेकचे आयोजन गडप्रेमी टेकर्स डहाणू ग्रुप चे अध्यक्ष अमुल तांडेल यांनी केले होते. सन २०१८ पासून ते ट्रेक चे आयोजन करतात. त्यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत ६५ ठिकाणी अशा ट्रेकचे आयोजन केले होते. या ट्रेकच्या उद्देशाबद्दल त्यांना विचारणा केली असता, प्रत्येक गडाचा इतिहास काय आहे? याची माहिती घेणे. तसेच गडावर स्वच्छता करणे वृक्ष लागवड करणे, गडावरील कचरा गोळा करून जाळणे, असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही ट्रेकच्या माध्यमातून राबवतो. असे अमुल तांडेल यांनी ट्रेक बद्दल सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!