चिंचणी बीचवर सुसाट वेगाने धावतात वाहने, घडू शकतो पुन्हा अनर्थ

ज्ञानेश्वर रामोशी
बोईसर :- मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२२ रोजी चिंचणी बीचवर सायंकाळी पर्यटकांची गर्दीत एका शिकाऊ चालकाने कार घातल्याने एका ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आणि सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.
त्या घटनेनंतर चिंचणी बीच वर वाहन चालविण्यास ग्रामपंचायत ने बंदी घातली होती.परंतु आजची परिस्थिती बघता वाहन कर ठेकेदार वाहन चालकांना कोणतीही सूचना न देता वाहन कर पावती देत गाडी बीच वर सोडतांना आणि बीचवर वाहन चालक वाहन शिकवितांना, मोटासायकलस्वार आणि कार चालक सुसाट वेगाने वाहन चालवताना दिसून येत आहेत.
चिंचणी बीच हे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले दिसून येते. मात्र मोटासायकलस्वार आणि कार चालक हे बीचवर या गर्दीत वाहन सुसाट वेगाने चालवताना दिसून येत आहेत.त्यामुळे कदाचित पुन्हा एकदा मोठा अनर्थ येथे घडू शकतो. अशी शंका पर्यटक व स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायत चिंचणी ने वाहन कर ठेका दिला असून ठेकेदार पैसे घेऊन गाडी बीच वर सोडत असतात. परंतु वाहन धारकांना कोणतीही सूचना ठेकेदार यांनी नेमलेले व्यक्ती देत नसून फक्त वाहन कर पावती देण्यात व्यस्त असतात.वाहन पार्किंग ची जागा येथे साईडला असून, वाहन बीचवर फिरवू नये. जर का वाहन बीच वर फिरविल्यास वाहन धारकांवर कारवाई होऊ शकते. असे वाहन धारकांना सांगण्याची गरज असतांना, हे आमचे काम नाही असे वाहन कर ठेकेदार च्या माणसांकडून बोलले जाते.
बीचवर पर्यटक फिरत असताना, लहान लहान मुले बीचवर मस्ती करीत असताना त्या गर्दीतून मोटासायकलस्वार आणि कार चालक वाहन शिकतांना तसेच काही वाहन धारक सुसाट वेगाने वाहन चालवताना दिसून येतात.त्यामुळे कदाचित या बीचवर पुन्हा अनर्थ घडू नये, त्यामुळे स्थानिकांकडून अशा वाहन वर कारवाईची मागणी केली जात आहे.