कारखान्याचे रासायनिक पाणी थेट शेतात, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून का होत नाही कारवाई?

ज्ञानेश्वर रामोशी
बोईसर :- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरण नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या Resonance Specialitities ltd या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ मेहेरबान झाला असल्याचे दिसून येत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक T-140. M/S RESONANCE SPECIALITIES LTD या कंपनीकडून रासायनिक पाण्यावर प्रक्रिया न करता दिनांक २२/११/२२ रोजी पाम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात खुलेआम रासायनिक पाणी सोडताना झोनल अधिकारी विश्वजीत सोरगे यांनी पकडले होते. यात सदर कंपनीकडून ETP बायपास करत शेतकऱ्यांच्या शेतात खुलेआम घातक रासायनिक पाण्याचे तलाव निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. तसा अहवाल उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला होता परंतु सदर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावत वारंवार पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रदुषित कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
तसेच याआधी दिनांक २४/०३/२१ रोजी देखील कंपनीकडून अश्याच प्रकारे घातक रासायनिक पाणी खुलेआम सोडत असल्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. पुन्हा एकदा कंपनी घातक रासायनिक पाणी सोडत असूनही कंपनी ला कारणे दाखवा नोटीस बजावत कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अश्याच औद्योगिक क्षेत्रातील कंपनीकडून खुलेआम पाणी सोडत असलेल्या अनेक कंपनीला टाळेबंदी करत कारवाई झालेली असताना मात्र गेल्या वर्षभरापासून अश्या कारवाईत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुवर्ण मध्य काढत थातूरमातूर कारवाई केली जात आहे. वारंवार घातक रासायनिक पाणी हे शेतात सोडत असल्याचे समोर आल्यावर देखील या कंपनीवर कारवाई का केली जात नाही. हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.