संतापजनक! तीस वर्षीय नराधमाचा चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

ज्ञानेश्वर रामोशी
बोईसर :- बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
बोईसर पोलीस ठाणे हद्दीत कुंभवली येथील रामजी नगर परिसरात एका चार वर्षीय चिमुरडीवर बाजूलाच राहत असलेल्या एका तीस वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजता घडली असून पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी रात्री ३:२० वाजेच्या सुमारास बोईसर पोलीस ठाण्यात पोक्सो आणि संबंधित कायद्यांतर्गत नुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण अंगदकुमार विश्वकर्मा (३० वर्षे) मूळचा यूपीचा रहिवाशी असून तो येथे कुटुंबाशिवाय राहतो. याने बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कुंभवली येथील रामजी नगर परिसरात शेजारीच राहत असणाऱ्या एका ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. आरोपी तरुणाला पकडुन लोकांनी चांगलाच चोप दिल्यामुळे, उपचारासाठी आरोपीला बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी विरोधात रात्री ३.२० वाजेच्या सुमारास बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून बोईसर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
बोईसर परिसरात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे वाढले असून भाडेकरूंना खोली द्यायच्या अगोदर त्यांची सखोल चौकशीची गरज आहे.परंतु बऱ्याच ठिकाणी अनधिकृत बांधकाम करीत भाडेकरूंबाबत खोली मालक कोणत्याही प्रकारची खात्री न करता खोली भाड्याने देत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या गंभीर घटना ह्या बोईसर परिसरात वाढल्या आहेत.परराज्यातून सराईत गुन्हेगार, विकृत व्यक्ती यांना सहजासहजी बोईसर परिसरात राहायला खोल्या उपलब्ध होत असल्याने बोईसर परिसरात गुन्हेगारी वाढतांना दिसत आहे.