बजाज हेल्थ केअर कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे कामगार नागेंद्र गौतम याचा गेला बळी

ज्ञानेश्वर रामोशी
बोईसर :- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नं. ई ६२/६३ या कारखान्यात दिनांक २३ रोजी सकाळी ६.२० च्या सुमारास ग्लास लाईन वेसल मध्ये अचानक आग लागली. त्या आगीच्या भडक्यात एका २८ वर्षीय कामगार गंभीररित्या भाजला गेला.त्यास सुरुवातीला बोईसर येथील संजीवनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु कामगार ७० टक्के गंभीररित्या भाजलेला असल्याने त्यास पुढील उपचारार्थ बोईसर येथून मुंबई येथे हलविण्यात आले. दुर्दैवाने शुक्रवारी त्या गंभीररित्या भाजलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ई – ६२/६३ असलेल्या बजाज हेल्थकेअर लि. (वेट फार्मा ली.) या कारखान्यात दि. २३ रोजी सकाळी ६: २० सुमारास ग्लास लाईन वेसल मध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक लागलेल्या आगीच्या भडक्यात कंत्राटदार रामरालाल यादव याच्या कंत्राटात काम करणारा २८ वर्षीय नागेंद्र गौतम हा कामगार ७० टक्के भाजला गेला होता. या कामगाराला प्रथम बोईसर येथील संजीवनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यास ऐरोली नवी मुंबई येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु शुक्रवारी दिनांक २४ रोजी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटनेच्या वेळी Glycine नावाच्या रसायनाचे बेकायदेशीर उत्पादन सुरु असताना पहिल्या मजल्यावरील ६ हजार लीटर क्षमतेच्या ग्लास लाईन वेसल मध्ये जवळ पास ४२०० लिटर Methanol मध्ये Monomethyl Chloro Acetate चे ॲडिशन वेसलच्या मेनहोल द्वारे टाकण्याचे काम सुरू असताना तापमान वाढल्याने आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेच्या वेळी घटना स्थळी प्रशिक्षित ऑपरेटर, सुपरवाईजर, सुरक्षा अधिकारी नसल्याचे व या कामासाठी कंत्राटी कामगार नागेंद्र गौतम यास कोणते ही प्रशिक्षण दिले गेले नसल्याचे समजते.
ठेकेदार रामलाल यादव हा या ठिकाणी काम करणार्या कामगारांना कामगार विमा संरक्षण, भविष्य निर्वाह निधी, सुरक्षा साधने, किमान वेतन, नियमीत आरोग्य तपासणी इत्यादी आवश्यक सुविधा देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या उत्पादनाव्यतिरिक्त बेकायदेशीर उत्पादन घेत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ बजाज हेल्थकेअर कारखान्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी गांभिर्याने दखल घेत नसल्याचे समजते. सदर कारखान्याला अन्न व औषध प्रशासनाने देखील फार्मा उत्पादन घेण्यासाठी परवाना देत बलड्रग्स सारखे उत्पादन घेण्यासाठी परवानगी नसताना Glycine सारखे बलड्रग्स सारखे उत्पादन घेत असताना अन्न व औषध प्रशासन देखील सदर कारखान्याला सोयिस्कर मोकळीक देत असल्याचे समजते.
सदर कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे एका गरीब कामगाराचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत कारखान्यावर कोणत्या प्रकारे कारवाई करण्यात येते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.