महिला व बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारचा मोठा निर्णय; नवी हेल्पलाईन सुरु होणार

न्यूज महाराष्ट्र24
मुंबई :- राज्यातील संकटग्रस्त महिला व बालकांना तातडीने आवश्यक ती माहिती व सहाय्य मिळण्यासाठी राज्य सरकारकडून नव्या हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. मिशन शक्ती अंतर्गत 181 महिला हेल्पलाइन ही केंद्राच्या धर्तीवर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
संकटात सापडलेल्या महिलांना सहाय्यता मिळण्यासह गरजेनुसार कायदेशीर, मानसिक, सामाजिक आधार महिलांना हेल्पलाइनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शासकीय योजनांची माहिती व समुपदेशन सुविधादेखील महिलांना टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती या एकछत्री योजनेतील महिलांची सुरक्षा व संरक्षण या उपाययोजनेंतर्गत ही हेल्पलाइन सुरू केली आहे.
महिला व बालविकास विभागाचे आयुक्त यांच्या स्तरावरून महिला हेल्पलाइन सुरू करण्यास शासन मान्यता दिलेली आहे. ही योजना पूर्णपणे केंद्र पुरस्कृत राहणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.