वेळोदे गावात संविधान दिवस उत्साहात; बुद्ध विहारात बुद्ध वंदना करून उपक्रम संपन्न

वेळोदे : देशभरात संविधान दिन उत्साहात साजरा होत असताना चोपडा तालुक्यातील वेळोदे गावातही या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील बुद्ध विहारात संविधान दिन मोठ्या श्रद्धा आणि राष्ट्रीय भावनेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना करून करण्यात आली. शांतता, समता आणि बंधुता या संविधानातील मुलभूत मूल्यांची उजळणी करत उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
या कार्यक्रमासाठी गावातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पोलिस पाटील मिलिंद करनकाळे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र करनकाळे, पुंजू करनकाळे, दामोदर करनकाळे, अजय करनकाळे यांच्यासह रमाई नगरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमादरम्यान संविधानाचे महत्व, नागरिकांचे कर्तव्य आणि अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
परिसरातील युवा व नागरिकांनी संविधानातील मूल्ये प्रत्यक्ष आयुष्यात जोपासण्याचा संकल्प या वेळी व्यक्त केला. बुद्ध विहारात झालेल्या या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमामुळे गावात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पसरला.
