मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, तपास सुरू

मुंबई :- मुंबई उच्च न्यायालयासह मुंबईतील सर्व न्यायालयांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली करत सुरक्षा यंत्रणा सतर्क केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर प्राप्त झाला. याची माहिती मिळताच पोलिस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले आणि खबरदारी म्हणून उच्च न्यायालयाची इमारत तात्काळ रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. मात्र तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
या ई-मेलमध्ये केवळ मुंबई उच्च न्यायालयच नव्हे तर किला कोर्ट, वांद्रे कोर्टासह मुंबईतील सर्वच न्यायालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आणि न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरळीत करण्यात आले.
दरम्यान, हा ई-मेल नेमका कुणी पाठवला, त्यामागचा उद्देश काय आणि धमकी कितपत गंभीर होती, याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास करत आहेत. कोर्ट परिसरात सध्या अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षेचे उपाय अधिक कडक करण्यात आले आहेत.



