पत्नी-प्रियकराच्या जाचाला कंटाळून पतीने जीवन संपवले

अमळनेर :- पत्नीच्या चारित्र्यहिन वर्तनाचा पर्दाफाश झाल्यानंतर तिनेच प्रियकर व त्याच्या आईसोबत मिळून पतीला अमानुष शब्दांत हिणवले, अपमानित केले आणि मानसिक छळ केला. या असह्य मनस्तापातून एका निरपराध पतीने धावत्या रेल्वेखाली उडी घेत आपले आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना २९ रोजी पहाटे अमळनेर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर व प्रियकराची आई यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ रोजी पहाटे रेल्वे रुळावर एका इसमाचा मृतदेह तुकडे-तुकडे अवस्थेत आढळून आल्याने अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. तपासाअंती मृताची ओळख सुनील श्रावण भोई (रा. रुबजी नगर, अमळनेर) अशी निष्पन्न झाली.
मयताचा भाऊ सागर भोई याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुनील मध्यरात्री सुमारे तीन वाजता जागा झाला असता त्याला पत्नी दीपाली सुनील भोई व तिचा प्रियकर अजय छोटू भोई हे घरातच नग्न अवस्थेत आढळून आले. संतप्त सुनीलने जाब विचारताच पत्नी व प्रियकराने उलट त्यालाच शिवीगाळ करत, “तू माणूस नाहीस, काहीच कामाचा नाहीस, तुला जगायची लायकी नाही, मरून गेलास तरी चालेल” अशा क्रूर व अमानवी शब्दांत अपमानित केले.
इतकेच नव्हे तर प्रियकराची आई सुरेखा छोटू भोई घटनास्थळी येऊन तिनेही सुनीलला त्याच पद्धतीने हिणवत मानसिक छळ अधिक तीव्र केला. या सततच्या अपमानाने व चारित्र्यहननाने पूर्णपणे कोलमडलेल्या सुनीलने राग व नैराश्यात घराबाहेर पडत मोटारसायकल काढली आणि टाकरखेडा मार्गावरील रेल्वे रुळावर जाऊन धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या भीषण घटनेत त्याचे डोके व शरीर अक्षरशः तुकडे-तुकडे झाले.
सुनील भोई यांच्या मृत्यूस पत्नी दीपाली, तिचा प्रियकर अजय भोई व प्रियकराची आई सुरेखा भोई हे थेट जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला असून, तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108, 333, 351(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी अजय भोई याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
पुढील तपास उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहेत.



