गुन्हे वार्ता

मुंबई हादरली! ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले गायब – ८ मुली बेपत्ता

मुंबई :- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. अवघ्या ३६ तासांच्या कालावधीत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बेपत्ता मुलांमध्ये ८ मुलींचा समावेश असल्याने चिंता आणखी वाढली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मुले बेपत्ता होणे, हे संघटित बाल तस्करीच्या दिशेने संशयाची सुई फिरवणारे असल्याचे बोलले जात आहे.

या गंभीर घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ ‘हाय अलर्ट’ जारी करत संपूर्ण शहरात विशेष शोध मोहीम हाती घेतली आहे. ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मुले बेपत्ता झाल्याची नोंद असून, यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

कोणत्या भागातून किती मुले बेपत्ता?

शिवाजीनगर – ४,

साकीनाका – २,

अँटॉप हिल – २,

ओशिवरा – १,

मानखुर्द – १,

बांगूर नगर – १,

घाटकोपर – १

पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या कोणत्याही कुटुंबाला खंडणीचे फोन आलेले नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरभर शोध मोहीम वेगात

बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.

गजबजलेल्या बाजारपेठा,रेल्वे स्थानके व बस डेपो, सार्वजनिक बागारुग्णालये, बालगृहे व निवारा केंद्रे या सर्व ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत.

मुंबईत बेपत्ता मुलांचे वाढते आकडे – धोक्याची घंटा!

जून ते डिसेंबर या कालावधीत मुंबईतून १४५ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती.त्यापैकी ९३ मुली होत्या.विशेष म्हणजे १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान ८२ मुले बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

२०२५ मध्ये महिन्यानुसार बेपत्ता मुलांची संख्या:

जून: २६ मुली,

जुलै: २५ (१५ मुले, १० मुली),

ऑगस्ट: १९ (५ मुले, १४ मुली),

सप्टेंबर: २१ (६ मुले, १५ मुली),

ऑक्टोबर: १९ (१२ मुले, ७ मुली),

नोव्हेंबर: २४ (९ मुले, १५ मुली),

डिसेंबर: ११ (५ मुले, ६ मुली)

प्रश्न गंभीर – उत्तरांची गरज तातडीची!

मुंबईसारख्या महानगरात सातत्याने अल्पवयीन मुले बेपत्ता होणे, हे केवळ आकडे नसून व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.ही प्रकरणे घरातून पळून जाण्याची आहेत की संघटित बाल तस्करीचा भाग, याचा छडा लावणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button