गुन्हे वार्ता

कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची लाच; नवापूर ग्रामसेवक रंगेहात अटकेत

पालघर | नवापूर : – पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक कृषी पर्यटन केंद्राला ना हरकत दाखला देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ही कारवाई केली असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नवापूर ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक राजेश पंढरीनाथ संखे याने एका कृषी पर्यटन केंद्राला ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदाराने पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. मंगळवारी झालेल्या पडताळणीत तक्रारीत तथ्य आढळून आले.

नवापूर गावातील संबंधित कृषी पर्यटन केंद्रामध्ये तरंग तलाव, पर्यटकांसाठी तीन खोल्या, उपहारगृह व न्याहारी गृह सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखल्याची आवश्यकता होती. मात्र, संखे यांनी अर्ज प्रलंबित ठेवत २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

यानंतर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे, तसेच विलास भोये, आकाश लोहारे व जितेंद्र गवळे यांच्या पथकाने सापळा रचला. पंचासमक्ष तक्रारदाराकडून २० हजार रुपये रोख स्वीकारताच संखे याला रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीनुसार सातपाटी पोलीस ठाण्यात संध्याकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा या घटनेतून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button