अंबिका ज्वेलर्सचे मालक रक्ताच्या थारोळ्यात; हल्लेखोर बेपत्ता, पोलिसांचा विशेष पथकाचा तपास सुरू

वसई : वसई परिसरात वाढत्या हल्ल्यांच्या आणि दरोड्यांच्या मालिकेत आणखी एका गंभीर घटनेची भर पडली आहे. वसई पूर्वेतील वालीव परिसरात अंबिका ज्वेलर्सचे मालक कालू सिंग यांच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने भर दुपारी चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटना कशी घडली?
जय नगरमधील आक्सा इमारतीत असलेल्या अंबिका ज्वेलर्समध्ये रोजच्या प्रमाणे कालू सिंग सकाळी दुकान उघडून कामकाज पाहत होते. दुपारी सुमारास एक अनोळखी व्यक्ती दुकानात घुसला आणि बेसावध असलेल्या सिंग यांच्यावर एकापाठोपाठ अनेक वार करून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिंग यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
हल्ल्यामुळे परिसरात भीती आणि गोंधळ
घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विशेष म्हणजे, हल्लेखोराने दुकानातून एकाही वस्तूला हात लावलेला नाही, त्यामुळे हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने होता की इतर काही वैमनस्यातून, याबाबत चर्चेला ऊत आला आहे.
पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना
वालीव पोलीस, गुन्हे शाखा आणि परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या पथकाने वेगाने तपास सुरू केला आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून, हल्लेखोराला लवकरच पकडले जाईल, असा विश्वास उपायुक्तांनी व्यक्त केला. दुकानातून कोणतीही चोरी न झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
वसई पूर्वेत यापूर्वी
देखील भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. वसई पूर्वेच्या वालीव सातिवली परिसरात रिलायबल ग्लोरी नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील ३०१ क्रमांकाच्या सदनिकेत राऊत कुटुंबिय राहतात. आई आणि मुलगा असे दोघेच घरी असताना तीन अनोळखी इसमांनी राऊत कुटुंबियांच्या घरात शिरत दरोडा टाकला होता. यावेळी चाकूचा धाक दाखवत १० लाखांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले होते. तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत या चोरांना आणि त्यांच्या इतर साथीदारांना कर्नाटकातून अटक करण्यात आली होती.



