पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात जीवाशी खेळ ! प्रशासन झोपेत ?

पातोंडा : “आरोग्य सेवा” नावाखाली थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आला आहे. वैद्यकीय अधिकारी आणि फार्मासिस्ट दोघेही बेपत्ता, आणि रुग्णांना औषधे देण्याची जबाबदारी थेट सफाई कर्मचाऱ्यांवर — हा प्रकार म्हणजे आरोग्य व्यवस्थेची उघडीपणे थट्टाच!
आरोग्य केंद्रात पाऊल टाकताच घाणीचा दुर्गंध, अस्वच्छता आणि निष्काळजीपणाचे भयावह चित्र समोर येते. जिथे रुग्ण बरे व्हायला येतात, तिथेच आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, एक गरोदर महिला उपचारासाठी दाखल असताना देखील डॉक्टर गायब! अशा गंभीर परिस्थितीतही जबाबदार अधिकारी घरी आराम करत असल्याचा आरोप होत आहे. हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून थेट मानवी जीवाशी केलेला खेळ असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला असून, “अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा देण्यात येत आहे.
पातोंडा आरोग्य केंद्रातील हा भोंगळ कारभार म्हणजे आरोग्य यंत्रणेचा काळा चेहरा — आता तरी प्रशासन जागे होणार का?



