गुटखा–सुगंधी सुपारी विक्रेत्यांना ‘मकोका’ची टांगती तलवार!

मुंबई: राज्यात गुटखा आणि सुगंधी सुपारीवर बंदी असतानाही शाळा–महाविद्यालयांच्या परिसरातही त्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे. अनेकदा छापे, जप्ती आणि पोलीस कारवाई झाली तरीही विक्री सुरुच राहिल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. गुटख्या आणि सुगंधी सुपारी विक्रेत्यांनाही ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा’ (मकोका) लागू करण्याच्या तयारीत एफडीए असून यासंदर्भाचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.
सात महिन्यांत २२ कोटींचा गुटखा जप्त
राज्यातील गुटखा–सुपारी विक्री रोखण्यासाठी एफडीएने १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जोरदार मोहिम राबवली.
३६५ दुकानांवर छापे, ३५४ दुकानांत प्रतिबंधित साठा आढळला, एकूण जप्ती : २२ कोटी १७ लाखांहून अधिक
गुटखा, पानमसाला, मावा, खर्रा, सुगंधित तंबाखू यांसह सर्वच प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गुजरात-महाराष्ट्र मार्गे अवैध गुटखा वाहतूक
गुटखा उत्पादनात गुजरात आघाडीवर असून मोठ्या प्रमाणावर तिथूनच महाराष्ट्रात अवैधरित्या साठा आणला जातो.
सीमावर्ती चेकनाक्यांवर तपासणी कडक,महाराष्ट्र मार्गे अन्य राज्यांत जाणाऱ्या साठ्यावरही लक्ष, जीपीएस ट्रॅकिंगसारख्या यंत्रणांचा विचार
विक्री रोखण्यासाठी ‘मकोका’चा बिगुल
जप्ती, दंड, गुन्हे दाखल झाले तरी विक्री सुरूच राहिल्याने गुटखा विक्री मागील साखळीबद्ध गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘मकोका’ लावण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे गुटखा माफियांना मोठे आव्हान उभे राहणार आहे.

