महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांचे समन्स; विनापरवागनी आंदोलनप्रकरणी सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश!

मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले असून, येत्या सोमवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सप्टेंबर महिन्यात मुंबईतील आझाद मैदानात विनापरवागनी आंदोलन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहा प्रमुख आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. यात सिताराम कलकुठ्ठे (बीड), विरेंद्र पवार (मराठी आरक्षण आंदोलन समन्वय, दादर), पांडुरंग तारक (जालना), प्रशांत सावंत (मुंबई) आणि चंद्रकांत भोसले (मुंबई) यांचा समावेश आहे.२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन झाले होते. या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. तरीही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर जमले होते.

आंदोलनादरम्यान घोषणाबाजी, रस्ते रोखणे आणि वाहतूक विस्कळीत करण्याचे प्रकार घडले होते.यामुळे पोलिसांनी कलम १८९(२), १८९(३), १९०, २२३(१), २२३(२), १२६(२), २७१ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(३), ३८, १३५ आणि १३६ अन्वये गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी पुढील चौकशीसाठी पोलिस निरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) ज्ञानेश्वर आव्हाड यांनी कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button