ध्वजवंदनानंतर उठले वादळ! बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने गिरीश महाजन अडचणीत
महिला कर्मचाऱ्याचा संतप्त सवाल – “माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही!”

नाशिक :- संपूर्ण देशात ७७ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा होत असताना नाशिकमधील शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडला. ध्वजवंदनानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकारावर वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी उघडपणे आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली, ज्यामुळे हा मुद्दा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.
“संविधानामुळेच तुम्ही मंत्री आहात!” – माधवी जाधव यांचा संताप
ध्वजवंदनानंतर बोलताना माधवी जाधव यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.“जे संविधानाचे शिल्पकार आहेत, त्यांचंच नाव पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेळ आली तर मी वाळूच्या गाड्या उचलेन, माती काम करेन; पण बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख पुसू देणार नाही. मला निलंबित करायचं असेल तर करा!”असे ठणकावून सांगत त्यांनी उपस्थित मंत्री आणि प्रशासनाला थेट सवाल केला.
पोलिसांचा हस्तक्षेप, तरीही आवाज बुलंद
माधवी जाधव यांचा रोष वाढत असताना महाराष्ट्र पोलीस दलाने हस्तक्षेप केला. वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावरही जाधव ठामपणे म्हणाल्या –“मॅडम, तुम्हीसुद्धा संविधानामुळेच आहात. पालकमंत्रीही संविधानामुळेच आहेत. मग प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बाबासाहेबांचंच नाव का घेतलं नाही?”हा थेट सवाल उपस्थितांनी ऐकून घेतला, पण उत्तर मात्र मिळालं नाही.
व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला. बाबासाहेबांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली, तर सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठली. “प्रजासत्ताक दिनाचा मानकरी डावलला गेला” असा आरोप जोर धरू लागला.
अखेर गिरीश महाजन यांची दिलगिरी
प्रकरण तापल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली.“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणं अनावधानाने राहिलं असेल. माझा तसा कुठलाही हेतू नव्हता. मी भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रश्न कायम – चूक की दुर्लक्ष?
दिलगिरीनंतरही एक प्रश्न कायम आहे – प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी संविधानाच्या शिल्पकारांचे नाव घेणे विसरणे ही चूक होती की जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष?या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नसले, तरी माधवी जाधव यांचा आवाज मात्र राज्यभर दुमदुमत आहे.


