नाशिक

बिबट्याच्या हल्ल्याने नाशिक हादरले; युवकाचा जागीच मृत्यू

नाशिक, दि. ७ नोव्हेंबर : नाशिक जिल्ह्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी सकाळी लोहशिंगवे भागात बिबट्याच्या हल्ल्यात ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत तरुणाचे नाव सुदाम म्हाळू जुंद्रे (वय ३०) असे असून तो पहाटेच्या सुमारास आपल्या शेताकडे जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. ग्रामस्थांनी आरडाओरड करत मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी सुमित निर्मळ व प्रशांत खैरनार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून घटनेचा सखोल तपास सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.देवळालीच्या तोफखाना स्कूल परिसरातील वडनेर, लोहशिंगवे, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लहवीत, पिंपळगाव खांब आणि दाढेगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे.वन विभागाकडून पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वाढती बिबट्यांची संख्या व दिवसाढवळ्या होणारे हल्ले यामुळे ग्रामीण भागातील लोक रात्री बाहेर पडणे टाळत आहेत.वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, ऊस व मक्याच्या शेतात बिबट्यांनी अधिवास तयार केला असून त्यांना अनुकूल वातावरण मिळाल्याने त्यांची संख्या वाढत आहे. वन विभागाने बिबट्यांचे निर्बिजीकरण करून नियंत्रण ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button