मुंबई

गॅस पाईपलाईनमध्ये गंभीर बिघाड; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील CNG वाहतूक विस्कळीत

मुंबई : वडाळा येथील आरसीएफ परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात सीएनजी पुरवठा ठप्प झाला आहे.

रविवारी दुपारपासून CNG चा पुरवठा बंद असल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बहुतांश CNG पंपांवर गॅस उपलब्ध नाही. या तुटवड्याचा सर्वाधिक फटका रिक्षा, टॅक्सी, कॅब चालक आणि प्रवाशांना बसत आहे.

सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.

अनेक पेट्रोल पंपांवर ‘CNG Not Available’ चे बोर्ड लावण्यात आले असून काही पंपांबाहेर लांबलचक रांगा दिसत आहेत.वडाळा-आरसीएफ कंपाऊंडमधील मुख्य सीएनजी पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनकडे जाणारा गॅसपुरवठा एकदम घटला. त्याचे पडसाद मुंबई महानगर प्रदेशातील 133 हून अधिक सीएनजी पंपांवर उमटले आहेत. मात्र महानगर गॅस लिमिटेडने घरगुती ग्राहकांना पीएनजी पुरवठा प्राधान्याने आणि सुरळीत ठेवण्याची खात्री दिली आहे.

दरम्यान, सीएनजीअभावी BESTच्या काही बसेस थांबण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. रिक्षा व टॅक्सीचालकांच्या वाहनांमधील गॅस जवळपास संपत आल्याने दुपारपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सीएनजीवर चालणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कंपनीकडून या बिघाडाच्या दुरुस्तीला किती वेळ लागेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तोपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिकांना वाहतुकीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button