मुंबई

वरळी सी-लिंकवर वेगाचा थरार! २५० किमी वेगाने धावणारी लॅम्बोर्गिनी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई :- मुंबईच्या शान असलेल्या वरळी सी-लिंकवर वेगाची हद्द ओलांडणे एका कार चालकाला चांगलेच महागात पडले आहे. ताशी तब्बल २५० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावणारी आलिशान लॅम्बोर्गिनी कार मुंबई पोलिसांनी जप्त केली असून, या प्रकरणाने शहरातील रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पिवळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी वरळी सी-लिंकवर वाऱ्याच्या वेगाने धावताना दिसत होती. विशेष म्हणजे, वरळी सी-लिंकवरील वाहनांची कमाल वेग मर्यादा ताशी ८० किमी आहे. मात्र, या कारने मर्यादेच्या तब्बल तिप्पट वेगाने धाव घेतल्याचे स्पष्टपणे दिसत होते. हा प्रकार केवळ नियमभंग नसून, इतर वाहनचालकांच्या जीवाशी थेट खेळणारा होता.

व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची तत्काळ कारवाई

हा व्हिडीओ व्हायरल होताच एका जागरूक नागरिकाने सोशल मीडियावरून मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत वरळी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सी-लिंकवरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कारचा शोध घेण्यात आला.

तपासात संबंधित कारचा नंबर HR 70 F 1945 असल्याचे निष्पन्न झाले. ही कार अहमदाबाद येथील व्यावसायिक नीरव पटेल यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. मात्र, घटनेच्या वेळी ही कार मालक नव्हे, तर फैज अडेनवाला नावाचा कार डीलर चालवत असल्याचे स्पष्ट झाले.

टॉप स्पीड टेस्ट’साठी सी-लिंकचा गैरवापर

मिळालेल्या माहितीनुसार, कारची टॉप स्पीड क्षमता तपासण्यासाठी फैज अडेनवालाने टेस्ट ड्राईव्ह घेतली होती. यासाठी त्याने थेट वरळी सी-लिंकची निवड केली आणि अत्यंत धोकादायक वेगाने गाडी पळवली.

https://www.instagram.com/reel/DSX0j4tDyWP/?igsh=YXRxbGwyYjQ3NWc=

गुन्हा दाखल, कार जप्त

या प्रकरणी वरळी पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर हा गुन्हा आता फैज अडेनवाला यांच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवणे, सार्वजनिक रस्त्यावर जीवितास धोका निर्माण करणे अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, संबंधित व्हिडीओ नेमका कधीचा आहे आणि कारची कागदपत्रे पूर्णपणे कायदेशीर आहेत का, याचाही सखोल तपास सुरू आहे.

पोलिसांचा सज्जड इशारा

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, रस्त्यावरील सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांवर आता फक्त दंडात्मक कारवाई न करता थेट वाहन जप्तीसारखी कठोर पावले उचलली जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button