पालघर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला फाट्यावर मारत बंगल्याचे बांधकाम सुरूच

बोईसर :- येथील परमाणु नगर मधील मुकुंद व्ही शर्मा यांनी पालघर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला फाट्यावर मारत अनधिकृत मजल्याचे काम सुरु ठेवले आहे. शासनाच्या आदेशाला तिलांजली देणाऱ्या अशा या लोकांवर कारवाई करण्याची गरज असताना त्यांना कोण पाठीशी घालते हा एक मोठा प्रश्न उपस्थित करत जिल्हाधिकारी यांच्या कडे न्यायासाठी अर्ज दाखल केला आहे.

बोईसर पश्चिम येथील सर्वे नंबर ३१/१/आणि ३१/२ या परमाणु नगर परिसरातील भूखंड क्रमांक ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३ आणि १४ — एकूण ५२७१ चौरस मीटर क्षेत्रफळ — न्यूक्लिअर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीचा असून, अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेश क्रमांक एनएपी/एसआर/३९/९७, दिनांक २५ फेब्रुवारी १९९७ नुसार ही जमीन रहिवासी प्रयोजनासाठी बिनशेती करण्यात आली होती.त्या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, या ठिकाणी तळमजला अधिक एक मजल्यापेक्षा जास्त बांधकाम करता येणार नाही. मात्र, प्लॉट नंबर ६ ए चे मालक मुकुंद व्ही. शर्मा यांनी या अटीचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. न्यायालयाचा आदेशाला फाट्यावर मारत पहिला, दुसरा मजल्यापर्यंत न थांबता तब्बल तिसऱ्या मजल्याचे काम सुरू केले आहे. मुकूंद व्हि शर्माने कोर्टात बांधकाम न करण्याचे लिहून दिले. मात्र न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असल्याचा फायदा घेत पुन्हा बांधकाम सुरू करत न्यायालयाचा अवमान केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी पालघर यांच्या कडे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मनोज भालचंद्र चुरी यांनी केली आहे.
कायद्याची भिती नसणाऱ्या अशा लोकांवर जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.



