दिवसाढवळ्या बिबट्याचा हल्ला! राणी शिगाव हादरलं, गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट

बोईसर :- पालघर जिल्ह्यातील बोईसरजवळ असलेल्या राणी शिगाव परिसरात बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन झाल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने थेट मानवी वस्तीकडे येत एका शेतकऱ्याच्या घराजवळील शेळीवर झडप घातली. काही क्षणांतच शेळीचा फडशा पाडत बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेत राणी शिगाव येथील रहिवासी बाबू सुरेश धोडी यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि बोईसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करत गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे तसेच रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. बिबट्याच्या हालचाली लक्षात घेता नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, असा सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून पुढील उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून, राणी शिगाव परिसरात भीतीचे सावट कायम आहे.



