पालघर

ई-मार्केट प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला गटांची क्षमता बांधणी कार्यशाळा

पालघर:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन व प्राइमोव्ह (PriMove) यांच्या संयुक्त विद्यमाने ई-मार्केट प्लॅटफॉर्मवर ग्रामीण उत्पादनांची विक्री करण्यासाठी महिला बचत गटांतील सदस्यांची क्षमता बांधणी या विषयावर 23 आणि 24 डिसेंबर असे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आले.

या कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. “ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दर्जेदार पॅकेजिंग, प्रभावी ब्रॅण्डिंग आणि नियमबद्ध लेबलिंग मिळाल्यास त्या उत्पादनांना ई-मार्केट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. महिला उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कार्यशाळेस प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक रवि बोबडे, राजश्री माने तसेच जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला उद्योजक व महिला बचत गटांच्या सदस्यांनी या प्रशिक्षणात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.प्राइमोव्ह संस्थेचे सागर सावंत व विक्रांत सोनी यांनी उपस्थित महिलांना संबंधित विषयावर प्रशिक्षण दिले.100 पेक्षा अधिक गटाच्या महिला आपले उत्पादनासह यामध्ये सहभागी झाल्या होत्या.या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये महिलांनी तयार केलेल्या विविध ग्रामीण उत्पादनांचे प्रकार, त्यासाठी लागणारे योग्य पॅकेजिंग साहित्य, आकर्षक व नियमबद्ध लेबल तयार करण्याच्या पद्धती, उत्पादनाची माहिती ई-मार्केट प्लॅटफॉर्मवर कशी नोंदवावी, तसेच अन्न प्रक्रिया व घरगुती उत्पादनांसाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय परवाने व नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना डिजिटल माध्यमातून विक्रीची संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button