
पालघर :- नववर्षाच्या स्वागतासाठी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षिततेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारे, फार्महाऊस, रिसॉर्ट्स, हॉटेल्स व गर्दीच्या ठिकाणी चोख आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
केळवा, सफाळा, सातपाटी, चिंचणी, डहाणू, घोलवड, बोर्डी तसेच जव्हार, वाडा, विक्रमगड, पालघर व तलासरी तालुक्यांतील फार्महाऊस व रिसॉर्ट्स येथे मुंबई, ठाणे, नाशिक, वलसाड आदी शहरांतून पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
🔍 गैरकृत्यांवर करडी नजर
जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हॉटेल्स, ढाबे, कॉटेजेस, फार्महाऊस येथे दारू पिऊन गोंधळ घालणे, मद्यधुंद वाहनचालक, मादक पदार्थांचे सेवन, महिलांशी गैरवर्तन यास प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
👩🦰 महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
नववर्षाच्या काळात महिला सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस व महिला पोलीस अंमलदारांचे पथक समुद्रकिनारे, बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे.
📱 सोशल मीडियावर सायबर वॉच
सायबर पोलिसांकडून समाजमाध्यमांवर २४ तास करडी नजर ठेवण्यात येणार असून, आक्षेपार्ह पोस्ट, अफवा, समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडीओ, फोटो किंवा ऑडिओ क्लिप्स टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
🚫 अंमली पदार्थांविरोधात मोहीम
नववर्षाच्या अनुषंगाने जिल्ह्यात येणारी वाहने, फार्महाऊस, हॉटेल्स, लॉजेस, पार्टी स्थळे व समुद्रकिनाऱ्यांवर साध्या वेशातील पोलीस पथके व स्थानिक गुन्हे शाखेची विशेष नजर असणार आहे.
🚦 वाहतूक नियोजन व ब्रेथ अॅनालायझर
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्य रस्ते व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर ब्रेथ अॅनालायझर द्वारे तपासणी करून कठोर कारवाई केली जाणार आहे.
नाकाबंदी व पेट्रोलिंग व्यवस्था
नववर्ष साजरे करताना कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी जिल्हाभरात :
• पोलीस ठाणे : १६
• नाकाबंदी पॉइंट : ३०
• फिक्स पॉइंट : २७
• पेट्रोलिंग पथके: ७१
👮♂️ भक्कम पोलीस बंदोबस्त
नववर्षाच्या स्वागतासाठी खालीलप्रमाणे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे –
• पोलीस अधिकारी : ६८
• पोलीस अंमलदार: ४२७
• वाहतूक पोलीस: ५२
📢 नागरिकांना आवाहन
नववर्ष साजरे करताना सर्व नागरिक व पर्यटकांनी पोलिसांना सहकार्य करावे, संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा गैरप्रकार आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालघरचे पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी केले आहे.
📞 पोलीस नियंत्रण कक्ष : 02525-205300 / 8669609544 / 8669604100
🚓 पोलीस हेल्पलाईन: 112



