विशेष

भावनांचा महापूर आणि आठवणींची शिदोरी; विद्याभवन एडवणमध्ये सुवर्ण महोत्सवी पुनर्मिलन सोहळा

बोईसर :- डिजिटल साधनांशिवाय शिक्षण घेतलेल्या पिढीतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे आजच्या काळात कठीण काम मानले जाते. मात्र विद्याभवन, एडवण येथील इयत्ता दहावी (सन १९७५–७६) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलत तब्बल ५० वर्षांनंतर सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे केले. भावनिक क्षण, जिवंत आठवणी आणि मैत्रीची उब अनुभवायला मिळाल्याने हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

शाळेच्या आवारात पाऊल ठेवताच अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. वर्गखोल्या, अंगण, मैदान आणि शाळेचा प्रत्येक कोपरा जुन्या आठवणींनी भरून गेला. माजी विद्यार्थी पुन्हा बाकावर बसले आणि क्षणभर तरी आपण पुन्हा शालेय जीवनात परतलो आहोत, अशी अनुभूती सर्वांनाच झाली.

अथक परिश्रमातून यशस्वी आयोजन

या स्नेहसंमेलनाचे आयोजन माजी विद्यार्थी समितीने केले होते. श्री प्रवीण साखरे, श्री धनंजय तांडेल, सौ. अरुणा चौधरी, श्री सिकंदर शेख यांच्यासह सौ. अस्मिता चौधरी, सौ. जया कलाके, श्री जयदेव आक्रे, श्री केसरीनाथ तरे, श्री नंदकुमार वर्तक, सौ. नैना म्हात्रे, श्री प्रदीप तरे, सौ. सुमन पाटील, श्री विलास पाटील आदी सदस्यांनी सातत्यपूर्ण संपर्क, नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर मोबाईल नसलेल्या काळातील मित्रमैत्रिणींना शोधून काढले. त्यांच्या या प्रयत्नांचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

पारंपरिक स्वागत व श्रद्धांजली

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थिनींच्या औक्षणाने व लेझीमच्या तालात काढलेल्या स्वागत मिरवणुकीने झाली. दीपप्रज्वलन, राष्ट्रगीत, प्रार्थना आणि स्वागत गीताने वातावरण मंगलमय झाले.यावेळी दिवंगत गुरुवर्य व दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी शिक्षक श्री ज्ञानदेव पाटील, श्री संतोष पाटील, श्री रामदास जाधव, श्री आनंदा राणे, श्रीमती वत्सला मेहेर, श्री अनिल रिसबूड यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज राऊत व संस्थेचे कार्यवाह श्री चंदुलाल घरत यांची उपस्थिती लाभली.

शाळेसाठी कृतज्ञतेची भेट

सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला अत्याधुनिक संगणक प्रदान करण्यात आला. तसेच सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी स्मृतिचिन्ह देण्यात आले.

पुन्हा एकदा विद्यार्थी जीवनात

यानंतर गुरुवर्यांनी प्रत्यक्ष वर्ग भरवून घेत माजी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात नेले. खेळ, मैदानी स्पर्धा आणि गप्पागोष्टींमधून सर्वांनी पुन्हा लहान झाल्याचा अनुभव घेतला. बक्षीस वितरण व आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च माजी विद्यार्थी समितीच्या माध्यमातून करण्यात आला असून प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वेच्छेने आपला खारीचा वाटा उचलला. गुरु–शिष्य नात्याचा सन्मान, शाळेप्रती कृतज्ञता आणि मैत्रीच्या जिवंत आठवणींनी परिपूर्ण असे हे सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन एडवणच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनातील एक संस्मरणीय पर्व ठरले.

या स्नेहसंमेलनास उपस्थित माजी विद्यार्थ्यांमध्ये श्री अनंत तांडेल, सौ. अरुणा चौधरी, सौ. अंजली पाटील, सौ. आशा वर्तक, श्री बाळकृष्ण ठाकूर, श्री चंद्रकांत तरे, सौ. चित्रा कवळी, श्री धनंजय तांडेल, श्री दामोदर वैती, सौ. दमयंती पाटील, श्री गणेश घरत, श्री हेमंत राऊत, श्री जयदेव आक्रे, श्री जगदीश तरे, सौ. जयमाला नाईक, सौ. ज्योती धनु, श्री केसरीनाथ तरे, श्री किशोर राऊत, श्री लीलाधर तांडेल, सौ. लक्ष्मी वैद्य, श्री मनोहर तरे, श्री मंगेश गोरे, श्री मोरेश्वर वैती, सौ. मुक्ता आक्रे, सौ. मेघा पाटील, सौ. मालिनी वर्तक, श्री नंदकुमार वर्तक, श्री नामदेव चौधरी, सौ. नयना वर्तक, श्री प्रदीप तरे, श्री प्रवीण साखरे, सौ. प्रमिला तांडेल, श्री प्रमोद वर्तक, श्री रमाकांत तांडेल, श्री रामनाथ पाटील, श्री राजू गाठे, सौ. रेखा पाटील, श्री सिकंदर शेख, श्री सदानंद तरे, सौ. सुमन पाटील, सौ. शारदा राऊत, सौ. शालिनी वर्तक, सौ. रेखा गोरे, सौ. सुनंदा पाटील, सौ. सुमन सातवे, सौ. उज्वला पाटील, श्री विलास पाटील, श्री विजय वैद्य, सौ. वंदना पाटील, सौ. वासंती वैती, सौ. वासंती राऊत, सौ. वनिता वर्तक, सौ. वासंती वर्तक यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button