अहो दादा…! आपल्या पालघर जिल्ह्यालयाच्या ठिकाणी आपल्या पक्षाचे कार्यालयच नाही

पालघर :- जिल्ह्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) ची स्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची ताकद असूनही, आजवर जिल्हा मुख्यालयावर पार्टीचे अधिकृत संपर्क कार्यालय नसल्याने आदिवासी बांधव तसेच कार्यकर्त्यांनी अहो दादा आमच्या जिल्ह्यात तुमचे कार्यालयच नाही अशा शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हाध्यक्ष नेमके करतात काय?
अनेक कार्यकर्त्यांचा सवाल— “आमच्या समस्या मांडायच्या तरी कोणाकडे?”जिल्हाध्यक्ष हे केवळ पदवाटप आणि बैठका या पुरते मर्यादित दिसत असल्याची टीका कार्यकर्त्यांकडून होत आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्ह्यात कोणतीच अधिकृत यंत्रणा किंवा संपर्क केंद्र नसल्याने असंतोष अधिक वाढतो आहे.
कार्यकर्ते संभ्रमात
संपर्क कार्यालय नसल्याने साध्या तक्रारींपासून संघटनात्मक विषयांपर्यंत सर्व प्रश्न अधांतरी आहेत. जिल्ह्यात पक्ष सत्तेत असताना देखील संघटनाला ‘घर’ नसणे ही मोठी दुर्दशा असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.



