पुण्याला कामासाठी निघालेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत; हडोळतीजवळ कारची जोरदार धडक, जागीच मृत्यू
हडोळतीत भीषण अपघात; दोन तरुणांचा करुण अंत

संभाजीनगर:- लातूरहून पुण्याला कामानिमित्त निघालेल्या दोन तरुणांचा अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोल नाक्यापासून एक किमी अंतरावर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
कार आणि दुचाकीची समोरासमोर झालेली जोरदार धडक इतकी भीषण होती की माधव गुलाब लोहगावे (२४) आणि संतोष संभाजी चिंतले (२०) हे दोघेही जागीच मृत्युमुखी पडले.मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील कार नायगावकडून लातुरच्या दिशेने जात होती. तर दोन्ही तरुण दुचाकीवरून पुण्याकडे रोजगारासाठी निघाले होते.
जगळपूर कॉर्नरजवळ रात्री उशिरा कारने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. अपघातानंतर कारचालक मात्र गाडी सोडून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही तरुणांचे मृतदेह हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दुपारच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत या दोन्ही तरुणांचे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणांच्या अचानक मृत्यूने लोहगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



