गणपतीपुळे समुद्रात तीन तरुण बुडाले; एका तरुणाचा मृत्यू, दोघांचे जीव वाचले

रत्नागिरी : गणपतीपुळे किनाऱ्यावर शनिवारी सायंकाळी उशिरा भिवंडीहून पर्यटनासाठी आलेल्या तिघा तरुणांचा समुद्रात बुडाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात अमोल गोविंद ठाकरे (२५) याचा मृत्यू झाला असून विकास विजय पालशर्मा (२४) आणि मंदार दीपक पाटील (२४) यांना समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी योग्य वेळी मदत करून बचावले.
सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढली असून समुद्रात जाण्याचा मोह धोकादायक ठरत आहे. भिवंडीतील सहा मित्र दर्शन आणि पर्यटनासाठी आले होते. यातील तिघे आंघोळीसाठी समुद्रात गेले असता त्यांनी खोल पाण्याकडे प्रयत्न केला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.
किनाऱ्यावर उभ्या त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा करून मदत मागितल्यानंतर मोरया वॉटर स्पोर्ट्सच्या बोटीवरील पथकाने तात्काळ धाव घेत तिघांना बाहेर काढले. त्यांना गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. परंतु तपासणीदरम्यान डॉक्टरांनी अमोल ठाकरेला मृत घोषित केले. उर्वरित दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास मालगुंड–गणपतीपुळे दूरक्षेत्राचे पथक करीत आहे.



