माणिकराव कोकाटे अटकेच्या छायेत! क्रीडामंत्र्यांवर कुठल्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता

नाशिक | विशेष प्रतिनिधी :- राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून, कुठल्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा आणि दंड कायम ठेवल्याने कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यानंतर अटक वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून, त्यावर आजच निर्णय होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाचा दणका; शिक्षा कायम
या प्रकरणात यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना २ वर्षे कारावास व १० हजार रुपयांचा दंड सुनावला होता. कोकाटे यांनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने अपील फेटाळून लावत मूळ निकाल कायम ठेवला आहे. परिणामी, अटक वॉरंट निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे सदनिका गैरव्यवहार प्रकरण?
माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्री कोट्यातून मिळणाऱ्या शासकीय सदनिकांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून लाभ घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनाही दोषी ठरवण्यात आले असून, प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.या प्रकरणाची तक्रार दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केली होती. त्यांच्या कन्या ॲड. अंजली दिघोळे–राठोड यांनी हस्तक्षेप याचिकाही दाखल केली आहे.
मंत्रिमंडळात हालचाली; कॅबिनेट बैठकीला दांडी?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत माणिकराव कोकाटे गैरहजर असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे.“हायकोर्टाकडून स्थगिती मिळाली नाही, तर कोकाटेंची खाती कुणाला द्यायची?” असा थेट सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवारांना केल्याचे समजते. हायकोर्टाची स्थगितीच आता कोकाटेंच्या मंत्रिपदासाठी निर्णायक ठरणार आहे.
हायकोर्टात धाव; आजच याचिका दाखल होणार
अटक वॉरंटासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे आजच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे. न्यायालयाकडून स्थगिती मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित पवारांचा सणसणीत टोला
या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.“कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? राहुल गांधी आणि सुनील केदार यांचे सदस्यत्व रद्द झाले, मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत?” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
https://x.com/i/status/2001182559871623477
पुढे काय?
अटक वॉरंटावर आज निर्णय होण्याची शक्यता,
मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळते का, याकडे लक्ष.
मंत्रिपद आणि खात्यांवर राजकीय घडामोडींचे सावट.
एकूणच, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे राजकीय भवितव्य आता न्यायालयीन निर्णयांवर अवलंबून असून, पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.


