“जळगाव औद्योगिक वसाहतीत भीषण आग; केमिकल कंपनी जळून खाक – लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली”

जळगाव : शहरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या आर्यव्रत केमिकल कंपनीला शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.
आगीची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दल, जैन इरिगेशनचे बंब, तसेच वरणगाव, जामनेर, भुसावळ आणि नशिराबाद नगर परिषदांचे अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
घटनास्थळी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी भेट देऊन नुकसानीचा आणि घटनेमागील कारणांचा आढावा घेतला. कंपनीतील कच्चा माल, तयार उत्पादने आणि यंत्रसामग्री पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त होत आहे.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता तपासली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून तपास सुरू केला आहे.
औद्योगिक वसाहतीत अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने कामगार सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. गेल्यावर्षी याच परिसरातील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीत बॉयलर स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता व २३ जण जखमी झाले होते. त्यानंतरही सुरक्षा नियमांचे पालन न झाल्याची टीका कामगार संघटनांकडून केली जात आहे.
सध्या अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

