गुन्हे वार्ता

डहाणूत सावकारीने घेतला बळी! सुसाईड नोटने उघड केला काळा व्यवहार; आरोपी फरार

डहाणू :- तालुक्यात अवैध खाजगी सावकारीचे जाळे किती अमानुष आणि जीवघेणे ठरत आहे, याचे आणखी एक विदारक उदाहरण समोर आले आहे. चिंचणी येथील एका कष्टकरी डायमेकिंग व्यावसायिकाने सावकारांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, मृत्यूनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमुळे पाच खाजगी सावकारांचे नाव उघड झाले आहे.

या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचणी येथील कै. किशोर दवणे हे डायमेकिंग व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी नवीन वायरकट मशिन खरेदी केली तसेच वर्कशॉपचे नूतनीकरण केले होते. यासाठी त्यांनी विविध ठिकाणांहून कर्ज घेतले होते. मात्र, अलीकडे व्यवसायात आलेल्या मंदीमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य झाले नाही.

या अडचणीच्या काळात त्यांनी काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. सुरुवातीला मदतीचा आधार वाटलेली ही रक्कम पुढे जाचक ठरली. मूळ रकमेपेक्षा कितीतरी जास्त पैसे परत देऊनही ‘व्याज बाकी आहे’ असे सांगत सावकारांकडून सतत फोनवरून शिवीगाळ, धमक्या आणि मानसिक छळ सुरू होता. रस्त्यात अडवून चारचौघांत अपमान केल्याने कै. दवणे मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते.

या अमानुष त्रासाला कंटाळून दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी कै. किशोर दवणे यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.मात्र, दि. ११ ऑगस्ट रोजी घराची साफसफाई करताना बेडखाली तीन पानी सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये अवैध सावकारी, सातत्याचा मानसिक छळ आणि धमक्यांमुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे नमूद असून, नितीन उमराव जैन (वाणगाव), इंद्रदेव विश्वनाथ गुप्ता (चिंचणी), तुषार हरेश साळसकर (चिंचणी), अरविंद रखमाजी पाटील उर्फ पिंटा (अंधेरी, मुंबई) आणि मंगेश भालचंद्र चुरी (चिंचणी) या पाच खाजगी सावकारांची नावे स्पष्टपणे लिहिण्यात आली आहेत.

मृताचा मुलगा जय किशोर दवणे यांच्या तक्रारीवरून दि. २० डिसेंबर रोजी वाणगाव पोलीस ठाण्यात संबंधित पाच जणांविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व आरोपी सध्या फरार असून, पुढील तपास वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button