दुय्यम निबंधक अधिकाऱ्याकडे २५ लाखांची खंडणी; दोन ‘बनावट पत्रकार’ अटकेत

ठाणे : समाजमाध्यमांवर खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याची धमकी देत दुय्यम निबंधक अधिकाऱ्याकडे तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. स्वतःला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख देणाऱ्या अजय पोपटलाल धोका (४६) आणि मनोज विजय मयेकर (५२) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून किरण मांजरेकर हा फरार आहे.
तक्रारदार अधिकाऱ्याने वरिष्ठ पोलिसांकडे अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. आरोपी तिघांनी विविध माध्यमे आणि युट्युब चॅनेलवर खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याची धमकी दिली होती. ही बदनामी टाळायची असेल, तर २५ लाख रुपये द्यावे, अशी खंडणीची मागणी केली जात होती.
१४ नोव्हेंबर २०२५ रोजी खंडणीविरोधी पथकाने कळवा येथील पारसिक नगरातील साई पूजा रेस्टॉरंटमध्ये सापळा रचला. तक्रारदाराकडून २० लाखांची रक्कम स्वीकारताच आरोपी अजय धोका याला दोन पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मिरा-भाईंदर परिसरातून मनोज मयेकरला अटक करण्यात आली. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
१५ नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास खंडणीविरोधी पथकाकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलिस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या पथकाने केली.
