पालघर

सामाजिक, आर्थिक व उपजीविकेच्या दृष्टीने मच्छीमारांचे सर्वेक्षण अत्यावश्यक….जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड

वाढवण बंदर प्रकल्प : मच्छीमार सर्वेक्षणावर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील मच्छीमारांचे सामाजिक, आर्थिक व उपजीविकेच्या दृष्टीने सर्वेक्षण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मच्छीमारांचे सखोल व शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, येथे बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्वेक्षणाचे महत्त्व, त्याची आवश्यकता आणि धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, महेश सागर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे सल्लागार राजीव सिन्हा, सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) ठाणे–पालघर, तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी, बाधित क्षेत्रातील मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील मच्छीमारांचे सर्वेक्षण होणे आवश्यक असून, सामाजिक, आर्थिक आणि उपजीविकेच्या दृष्टीने सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. मच्छीमारांच्या वास्तव परिस्थितीची अचूक नोंद होणे, त्यांचे हक्क, उपजीविकेवर होणारा परिणाम आणि भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, बाधित क्षेत्रातील मच्छीमार संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडत सखोल चर्चा केली. प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील मच्छीमारांचे सर्वेक्षण कशा पद्धतीने करावे, तसेच सर्वेक्षण धोरण कसे असावे, याबाबत विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक सर्वेक्षणाबाबत सविस्तर माहिती देत सर्वेक्षण प्रक्रियेची रूपरेषा स्पष्ट केली.

बैठकीच्या शेवटी बाधित क्षेत्रातील मच्छीमार संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी, सध्या बाधित होणाऱ्या १६ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील इतर मच्छीमारांचेही सर्वेक्षण होणे अत्यावश्यक असल्याची भूमिका मांडली. तसेच JNPA मार्फत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाच्या कामास पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button