“नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री! दहाव्या शपथविधीला मोदी-शाह उपस्थित”

बिहारच्या सत्तापरिसरात पुन्हा एकदा नितीश कुमार यांची धुरा कायम राहणार आहे. भाजपा पेक्षा चार आमदार कमी निवडूनही ‘एनडीए’च्या एकमुखी पाठिंब्याने जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. गुरुवारी (२० नोव्हेंबर) पाटण्यातील गांधी मैदानात भव्य शपथविधी सोहळा होणार असून, नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन ऐतिहासिक विक्रम रचणार आहेत.
या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. नितीश कुमार यांनी बुधवारी सायंकाळी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेऊन एनडीए सरकार स्थापनेचा दावा सादर केला.
भाजपाकडून उपमुख्यमंत्री कोण?
तसेच भाजपा आमदारांच्या बैठकीत पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सम्राट चौधरी यांची भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विजय कुमार सिन्हा यांची उपनेते म्हणून निवड केली. तसेच हे दोघेही बिहारच्या नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली.सम्राट चौधरी यांनी तारापूर विधानसभेतून विजय मिळवला आहे तर सिन्हा यांनी लखीसराय मतदारसंघातून विजय मिळवला.
एनडीएचा मोठा विजय१४ नोव्हेंबर रोजी लागलेल्या निकालात एनडीएने २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकल्या. यात भाजपाच्या ८९, जदयूच्या ८५, लोजप (रामविलास) १९, हमच्या ५ आणि आरएलएम पक्षाच्या ४ जागांचा समावेश होता.



