ताप-अंगदुखीवर घेत असाल ‘हे’ औषध? सावध व्हा! केंद्र सरकारची थेट बंदी

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी झाल्यावर डॉक्टरांचा सल्ला न घेता सर्रास घेतलं जाणारं औषध आता नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निमेस्युलाईड (Nimesulide) या औषधावर मोठा निर्णय घेत थेट बंदी जाहीर केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निमेस्युलाईडचं प्रमाण १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त असणारी सर्व औषधं तयार करणे, विक्री करणे आणि वितरित करणे बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे.
आरोग्यास गंभीर धोका! सरकारची स्पष्ट भूमिका
आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की,१०० मिलीग्रॅमपेक्षा अधिक निमेस्युलाईडचं सेवन केल्यास यकृताला गंभीर इजा होण्याचा धोका आहे.
“या औषधांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची सरकारला खात्री पटली आहे. यासाठी सुरक्षित पर्यायी औषधं उपलब्ध असल्याने जनहितार्थ हा निर्णय घेण्यात येत आहे,”असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
ICMR चा इशारा ठरला निर्णायक
ही बंदी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या शिफारशीनंतर लागू करण्यात आली आहे.निमेस्युलाईडमुळे यकृत संसर्ग (Liver Infection) झाल्याची अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर ICMR ने केंद्र सरकारकडे ठोस शिफारस केली होती. केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेने ही शिफारस मान्य करत बंदीचा निर्णय घेतला आहे.
कोणाला देऊ नये हे औषध? ICMR ची कडक मार्गदर्शक तत्त्वे
ICMR ने निमेस्युलाईड वापराबाबत कठोर नियम लागू केले आहेत :
🔹 इतर सर्व औषधं निष्प्रभ ठरल्यावरच शेवटचा पर्याय म्हणून वापर
🔹 गर्भवती, बाळंतपणानंतरच्या महिला व गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना पूर्ण बंदी
🔹 यकृताचा आजार असलेल्या रुग्णांना देऊ नये
🔹 १२ वर्षांखालील मुलांना हे औषध देण्यास सक्त मनाई
🚫 कफ सिरप थेट मेडिकलमधून विक्रीवरही बंदी
निमेस्युलाईडप्रमाणेच केंद्र सरकारने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्रीवरही बंदी घातली आहे.कफ सिरपला आता ‘परिशिष्ट क’ मधून वगळण्यात आलं असून,
👉 डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री किंवा खरेदी बेकायदेशीर ठरणार आहे.
मात्र, कफसाठीच्या गोळ्या व टॅबलेट्ससाठी नियमांत सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुलांच्या मृत्यूच्या घटनांनंतर सरकार सतर्क
मध्य प्रदेशमध्ये नुकतीच हानीकारक घटक असलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे २२ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.राजस्थानमध्येही मुलांसाठी नसलेलं कफ सिरप दिल्याने चिमुकल्यांचे बळी गेले होते.
या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औषध विक्री नियम अधिक कठोरपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
🛑 नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा
👉 डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
👉 ताप-अंगदुखीवर सर्रास औषधांचा वापर टाळा.
👉 आरोग्याशी खेळ करणाऱ्या मेडिकल विक्रेत्यांविरोधात तक्रार करा.
