पालघर

सुरत–नांदेड एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची मागणी;–खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे निवेदन

नदीम शेख वार्ताहर,

पालघर :- मराठवाड्यातील प्रवासी, विद्यार्थी व नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी सुरत ते नांदेड (व्हाया कल्याण–वसई विरार–छत्रपती संभाजीनगर) एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची मागणी मुंबई पश्चिम भागातील मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.या संदर्भातील लेखी निवेदन मंडळाचे प्रतिनिधी दर्शन भंडारे यांनी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांना सादर केले.सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठवाड्यातील अनेक व्यावसायिक, प्रशासकीय कर्मचारी, औद्योगिक कर्मचारी, विद्यार्थी आणि रोजगाराच्या शोधातील चाकरमानी सध्या मुंबई पश्चिम उपनगरांमध्ये बोरीवली, भाईंदर, वसई-विरार, पालघर, बोईसर तसेच गुजरातमधील वापी, वलसाड आणि सुरत परिसरात स्थायिक आहेत. तथापि, या भागातून छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड व धर्माबाद या मराठवाड्यातील प्रमुख शहरांदरम्यान थेट रेल्वेसेवा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक ठिकाणी रेल्वे बदलून जोखमीचा व वेळखाऊ प्रवास करावा लागतो.वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वे आरक्षणातही अडचणी निर्माण होत असून, मराठवाडा–मुंबई–गुजरात या मार्गावरील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक किंवा मुंबईला जावे लागते, तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगार व नोकरदार वर्गालाही नियमित प्रवास करावा लागतो. त्यामुळे सुरत–नांदेड एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्यास प्रवाशांसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा प्रवास होईल, अशी अपेक्षा प्रवासी नागरिक व मराठवाडा मित्र मंडळाने व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button