खंडेराव महाराज यात्रेला वेळोदे गाव सज्ज
८७ वर्षांची अखंड परंपरा; लाखोंची उलाढाल, तमाशांचे आकर्षण आणि सांस्कृतिक वैभव

दिपक करनकाळे
वेळोदे वार्ताहर – खानदेश मधील ग्रामीण भागातील सर्वात नावाजलेल्या आणि भव्य यात्रांपैकी एक असलेल्या खंडेराव महाराज यात्रेला उद्या शुभारंभ होत आहे. तब्बल ८ ते १० दिवस चालणाऱ्या या यात्रेची परंपरा ८७ वर्षांची असून प्रत्येक घरात पाहुण्यांची लगबग आणि उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.


आख्यायिका: स्वप्नात दर्शन आणि मूर्तीचा चमत्कार
सन 1902 मध्ये वेळोदे येथील कै. मोतीराम तुळशीराम बोरसे यांच्या स्वप्नात खंडेराव महाराज प्रकट झाले व विशिष्ट ठिकाणी जमीन खोदण्यास सांगितले. खोदकामात महाराजांची मूर्ती प्राप्त झाली आणि नंतर नवीन ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली.सन 1938 मध्ये कै. सुकलाल तुळशीराम बोरसे व कै. वनाजी सखाराम बोरसे यांनी बाजार चौकात मूर्ती स्थापित करत यात्रेला औपचारिक सुरुवात झाली.
चंपाषष्ठीला यात्रेचा मुख्य सोहळा
उद्या खंडेराव महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक टाळ–मृदुंगाच्या गजरात गावातून निघणार आहे.महाराजांची “तळी” उठवून पूजा-विधी, खोबरे–गुळाचा प्रसाद वाटप आणि भक्तांच्या घरी तळी उभारण्याचा पारंपरिक विधी पार पडणार आहे.
यात्रेचे विशेष आकर्षण : तमाशा रंगमंच
ग्रामीण भागातील पारंपरिक मनोरंजनाची परंपरा जपणारे सुप्रसिद्ध तमाशा मंडळे यात्रेत आकर्षण ठरत असतात.यावर्षी सुकलाल भाऊ बाबुलाल भाऊ बोराडीकर आणि भीमा नामा यांच्या तमाशांचे आयोजन असल्याची माहिती सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.
ग्रामीण संस्कृती आणि व्यापाराचा मोठा मेळा
खंडेराव महाराज नवसाला पावणारे असल्याने 27 खेड्यांतील भाविक येथे मानता मागण्यासाठी येतात.भांडी, लग्नसामग्री, आंधनासाठी वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होते.धुळे, सोनगीर, चोपडा आदी ठिकाणांहून व्यापारी येऊन लाखो रुपयांची उलाढाल करतात.यात्रा संपूनही 15 दिवस (तांबड कासार) व्यापारी गावात राहतात.
सुरक्षा, स्वच्छता आणि आकर्षणांची तयारी पूर्ण
ग्रामपंचायतने यात्रेनिमित्त स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गाव सजवले आहे.मोठे पाळणे, मौत का कुवा यांसारखी करमणुकीची साधनेही बसवण्यात आली आहेत.
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली Api शेषराव नितनवरे यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन कायदा-सुव्यवस्था आणि आचारसंहितेचे पालन याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि गावातील तरुण उपस्थित होते.
वेळोदेची यात्रा : परंपरेचा ठेवा आणि भक्तीचा उत्सव!
खंडेराव महाराजांच्या कृपेने वर्षानुवर्षे सुरु असलेला हा सांस्कृतिक महोत्सव आजही तितक्याच जोशात आणि भक्तिभावाने पार पाडला जात आहे.
