एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलली; आता २१ डिसेंबर ऐवजी ४ जानेवारीला परीक्षा

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीमुळे अखेर एमपीएससीने गट–ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. २१ डिसेंबर रोजी होणारी ही महत्त्वाची परीक्षा आता ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने झालेल्या २ डिसेंबर आणि होणाऱ्या २० डिसेंबर रोजी च्या मतदानानंतर सर्व मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक केंद्रांवर परीक्षा व मतमोजणी केंद्रे एकमेकांच्या अत्यंत जवळ असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, लाऊडस्पीकरचा आवाज आणि मनुष्यबळाची कमतरता या कारणांमुळे परीक्षा सुरळीत पार पाडणे कठीण होणार असल्याचे स्पष्ट झाले.
महसूल विभागातील कर्मचारी मतमोजणीत गुंतणार असल्याने परीक्षा आयोजन अशक्य असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यानुसार आयोगाने परीक्षा पुढे ढकलत नवा निर्णय जाहीर केला आहे.
आयोगाच्या पत्रानुसार —🔹 गट–ब संयुक्त पूर्वपरीक्षा – २०२५ : ४ जानेवारी २०२६
🔹 गट–क संयुक्त पूर्वपरीक्षा – २०२५ : ११ जानेवारी २०२६
या परीक्षांद्वारे पीएसआय, एसटीआय आणि एएसओ पदांची भरती केली जाणार असून यंदा ६७४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सुरुवातीला ९ नोव्हेंबरला नियोजित असलेली परीक्षा पूरस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील गुंतागुंत वाढल्याने अखेर पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करावा लागला.
परीक्षेच्या तारखेबाबत उमेदवारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला असून सुधारित तारखेनुसार तयारी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. आयोगाने सर्व उमेदवारांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.



